मुंबई (प्रतिनिधी)- महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा' असल्याचा खोटा आरोप करून आणि सोशल मीडियाद्वारे त्याचा हेतुपुरस्सर प्रसार करीत नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहक संघटनेचे नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर व ‘कोकणसाद' यूट्यूब न्यूज चॅनेलचे संपादक सागर चव्हाण यांच्याविरुद्ध सावंतवाडी (जि. सिंधुदूर्ग) पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 12) फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.
या खोट्या आरोप प्रकरणी महावितरणकडून गंभीर दखल घेण्यात आली. स्मार्ट मीटरबाबत कपोलकल्पित तसेच नागरिकांमध्ये भीती व दहशत निर्माण होईल असे जाहीर व रेकॉर्डेड वक्तव्य केल्याप्रकरणी नंदन वेंगुर्लेकर आणि केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ही खोटी माहिती सर्व सोशल मीडियाच्या खात्यांवरून प्रसारित केल्याप्रकरणी यूट्यूबचे संपादक सागर चव्हाण याच्याविरुद्ध जनतेत भीती निर्माण करून गुन्ह्यास चिथावणी देणे, गुन्हेगारी पद्धतीने धमकावणे, शांततेचा भंग करण्यासाठी जाणीवपूर्वक अपमान करणे, बदनामी करणेबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार कलम 353 (1) (बी), 351 (3), 352 व 356 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस पुढील तपास करीत आहे.
स्मार्ट मीटर हे पूर्णपणे सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यात कोणताही ‘कॅमेरा' किंवा गोपनीयतेचा भंग करणारी यंत्रणा नाही. वीजग्राहकांनी स्मार्ट मीटरबाबत पूर्णतः निश्चिंत राहावे. कोणत्याही कपोलकल्पित माहिती व खोटारड्या आरोपांना बळी पडू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. स्मार्ट मीटरबाबत अत्यंत खोटी व काल्पनिक माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात येत असल्याचे देखील महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, सावंतवाडी (जि. सिंधुदूर्ग) येथे कोकणसाद यूट्यूब न्यूज चॅनेलमध्ये स्मार्ट मीटर संदर्भात चर्चासत्र ठेवण्यात आले. त्यांचे रेकॉर्डिंग शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी करण्यात आले. या चर्चासत्रामध्ये महावितरणकडून उपकार्यकारी अभियंता योगेंद्र वाघ, ग्राहक संघटनेचे नंदन वेंगुर्लेकर तसेच दीपक पटेकर सहभागी झाले होते. यामध्ये महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत विविध फायद्यांची माहिती देण्यात आली तसेच विविध आरोपांचे सर्मपक खुलासे करण्यात आले.
तथापि, या चर्चासत्रामध्ये नंदन वेंगुर्लेकर यांनी स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा' असल्याचा धादांत खोटा आरोप केला. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांच्या खाजगी आयुष्यावर पाळत ठेवली जात असल्याचा अत्यंत हास्यास्पद दावा त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला. याबाबत महावितरणचे श्री. वाघ यांनी त्याचवेळी स्पष्टीकरण दिले. तरीसुद्धा कोकणसाद यूट्यूब न्यूज चॅनेलने त्यांच्या इतर सोशल मीडियाच्या खात्यांवरून स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा' असल्याची खोटी जाहिरात केली आणि या चर्चासत्रातील संदर्भ वगळून दिशाभूल करणारा 2 ते 3 मिनिटांचा भाग ‘स्मार्ट मीटरची चिरफाड' या मथळ्याखाली रिलच्या माध्यमातून हेतुपुरस्सरपणे प्रसारित केला. त्यात महावितरणकडून करण्यात आलेला खुलासा देखील वगळण्यात आला.