तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील कात्री गावात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि शेजाऱ्याची मोटारसायकल असा एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तुळजापूर तालुक्यात चोऱ्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नसल्याने शहरासह ग्रामीण भागातील जनतेत सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद साहेबराव सोनवणे (वय 40, रा. कात्री, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्या घराचा कोयंडा अज्ञात चोरट्यांनी 11 जुलै रोजी रात्री 10 ते 12 जुलै रोजी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील 15 ग्रॅम वजनाचे सुमारे 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यानंतर शेजारी राहणारे शंभू कुंडलीक येल्लाळ यांच्या मालकीची एमएच-25-बीई-7820 क्रमांकाची सुमारे 60 हजार रुपये किमतीची मोटारसायकल देखील चोरून नेली. या चोरीत एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला.
याप्रकरणी शरद सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 12 जुलै 2026 रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 331(4) व 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.