उमरगा (प्रतिनिधी)- सरकारने अनुसूचित जाती मध्ये फूट पाडण्यासाठी अ, ब, क, ड उपवर्गीकरणाचा जो घाट घातला आहे तो संविधानिक नाही. तो अनुसूचित जाती समूहावर अन्यायकारक असून त्यांच्या संविधानिक अधिकारावर थेट गदा आणणार आहे. त्यामुळे हे उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी उमरगा येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्यावतीने 59 जातींच्या हजारो महिला, युवक, युवती व पुरुष यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या या अन्यायकारक व जुलमी निर्णयाविरुद्ध वज्रमुठ एकवटून दि.3 जुलै रोजी महाएल्गार मोर्चा काढण्यात आला.
यावेळी हातात निळे ध्वज व उप वर्गीकरण रद्द करण्याचे बॅनर घेऊन उपवर्गीकरण रद्द करा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, मनुवादी सरकारचा अधिकार असो अशा विविध गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. उमरगा येथील हुतात्मा स्मारकापासून सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास हजारोंच्या संख्येने निघालेला हा विराट मोर्चा बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सभेत सभेत रूपांतर झाले.
यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले, कैलास शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे हरीश डावरे यांनी सरकारवर टिका करत भाषण केले. यावेळी एस.के. चेले, ॲड शीतल चव्हाण, चंद्रकांत कांबळे आणि आनंद कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले. सभेनंतर कृती समितीच्या शिष्टमंडळाने तहसिलदार गोविंद येरमे यांना उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. या मोर्च्यात पंचायत समिती सभापती ऍड आकांक्षा चौगुले, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, दिलीप भालेराव, धीरज बेळंबकर ऍड हिराजी पांढरे, ऍड मल्हारी बनसोडे, नेताजी गायकवाड यांच्यासह हजारों नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
