दुहेरी जबाबदारीतूनही क्रीडासेवेचा ध्यास; NIS प्रशिक्षक अमर सुपेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
भूम,
 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने फिट इंडिया अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला खेळाडूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या शिबिरासाठी अनुभवी NIS प्रशिक्षक तथा रवींद्र हायस्कूल, भूम येथील क्रीडा शिक्षक अमर सुपेकर यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते अत्यंत समर्पित भावनेने खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत.
विशेष म्हणजे, सध्या जनगणनेचे शासकीय दायित्व पार पाडत असतानाही अमर सुपेकर हे कबड्डी प्रशिक्षणाची जबाबदारी तितक्याच प्रामाणिकपणे सांभाळत आहेत. दिवसभर जनगणनेचे काम आणि त्यानंतर खेळाडूंना नियमित प्रशिक्षण देत ते दुहेरी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडूंमध्ये कबड्डीबाबत आत्मविश्वास, शिस्त आणि जिद्द निर्माण होत आहे. प्रशिक्षणातील तांत्रिक बारकावे, शारीरिक तंदुरुस्ती आणि खेळातील रणनीती याबाबत ते खेळाडूंना प्रभावी मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे अनेक होतकरू खेळाडूंना नवी दिशा मिळत असून त्यांच्या खेळात लक्षणीय सुधारणा होत आहे.
कबड्डी या खेळावरील निस्सीम प्रेम आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर अमर सुपेकर यांनी आजवर अनेक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान, सेवाभाव आणि खेळाडू घडविण्याची तळमळ पाहता कबड्डीप्रेमी, पालक व क्रीडावर्तुळातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 
Top