जनतेच्या प्रश्नांसाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा तालुकानिहाय जिल्हा दौरा; तहसीलदारांना निवेदने, मतदार जनजागृती मोहिमेलाही प्रारंभ



धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी तालुकानिहाय व्यापक जिल्हा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महागाई, बेरोजगारी, डिझेल दरवाढ, पेपर फुटीच्या घटना तसेच SIR आणि मतदार यादीतील त्रुटी यांसारख्या गंभीर विषयांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा दौरा राबविण्यात येत आहे.

या दौऱ्याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन संबंधित तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात येणार असून, नागरिकांच्या समस्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. डॉ. पाटील हे कळंब, परंडा, भूम, वाशी, उमरगा, लोहारा आणि तुळजापूर तालुक्यांना भेट देऊन स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांसमवेत प्रशासनाला निवेदने सादर करणार आहेत.

तसेच SIR आणि मतदार यादी संदर्भातील त्रुटी, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि मतदान हक्काबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मतदार जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत माहिती देण्यासोबतच मतदार यादीतील चुका दूर करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

यावेळी डॉ. पाटील यांनी वाढती महागाई, डिझेल दरवाढ, बेरोजगारी, पेपर फुटीच्या घटना आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत शासनाला जाब विचारला आहे. नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही व्हावी, तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

या जिल्हा दौऱ्याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत असून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्हाभर सुरू असलेल्या या मोहिमेला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
 
Top