धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृह येथील मीटिंग हॉलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ व निष्ठावंत शिवसैनिकांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला युवा सनेचे जिल्हा समन्वयक ॲड.संजय भोरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोडके, माजी तालुकाप्रमुख शिवाजी सरडे, ॲड.संदीप देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य उत्तम कांबळे, विजय काकडे, माजी विभाग प्रमुख राजेंद्र तुपे आदींसह निष्ठावंत व जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कडाडून टिका करण्यात आली. 

पत्रकार परिषदेत बोलताना युवासेनेचे जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टिका केली. ॲड.भोरे म्हणाले की, समोरच्याकडे सत्ता आणि पैसा आहे तर मग मातोश्रीवर येऊन निष्ठेच्या आणाभाका कशाला घेतल्या? उद्धव साहेब यांनी दोनदा आमदारकीचं आणि दोनदा खासदारकीचे तिकीट दिले, शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून प्रचार केला आणि जनतेने विश्वासाने निष्ठावंत म्हणून तुम्हाला 2024 मधे मतदान केले. असे सांगून ॲड. भोरे यांनी घणाघाती टिका केली. 

माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोडके यांनी देखील ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून आम्ही पक्ष वाढवला असे सांगितले. तर ओमराजे निंबाळकर यांनी फक्त आयत्या बिळावर नागोबा एवढीच भूमिका ठेवली. तर माजी तालुकाप्रमुख शिवाजी सरडे यांनी सांगितले की धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यापूर्वीही शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत.  तसेच ॲड.संदीप देशमुख यांनी ओमराजे यांच्यावर बोलताना म्हणाले की, ओमराजे महागद्दार असून यांचे राजकारण फक्त स्वयं केंद्रित व पाहुण्या रावळ्यांच्या भोवती केंद्रित असल्याचे सांगितले. 

 
Top