धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागाच्या वतीने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ म्हणजेच फैरवेल पार्टी तसेच विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत अत्यंत भावनिक व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. दीपिका देशमुख व श्री. शशिकांत सूर्यवंशी यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक आयुष्यात प्रामाणिकपणा, सातत्यपूर्ण शिक्षण आणि तांत्रिक कौशल्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. “यश ही मंजिल नसून सतत चालणारा प्रवास आहे; ज्ञान, शिस्त आणि मेहनत हेच त्याचे खरे इंधन.” असा सूर पालकातून आला आणि महादेव मोरे,सूर्यकांत मोरे पाटील व कल्याण तांबारे या पालकांनीही अभिनंदन केले.
यानंतर विविध बहुराष्ट्रीय व नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेल्या अनेक विद्यार्थ्यांपैकी अभिषेक माने, करण मुंढे,स्वरूपा साळुंखे ,अश्विनी मोरे,प्रथमेश माने देशमुख,प्राजक्ता तांबारे,ऋषिकेश मोरे पाटील, ऋतुजा वऱ्हाडे,अस्मिता पवार,ऋषिकेश नार्गले,जाह्नवी सूर्यवंशी, सायली वाघमोडे या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागील पालकांचे योगदान गौरवत त्यांनाही सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित पालकांनी विभागाच्या शैक्षणिक गुणवत्ता, मार्गदर्शन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे कौतुक केले.
विभागप्रमुख प्रा. पी. एम. पवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना सातत्याने नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याचे, उद्योगक्षेत्रातील बदलांशी जुळवून घेण्याचे आणि नैतिक मूल्ये जपत करिअर घडविण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत, तंत्रज्ञानाच्या युगातआर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स क्षेत्रातील संधींचा पुरेपूर लाभ घेण्याचा सल्ला दिला आणि “विद्यार्थी हा महाविद्यालयाचा खरा ब्रँड ॲम्बेसेडर असतो; त्याचे यश म्हणजे संस्थेचा अभिमान ”असे प्रतिपादन केले.
या सोहळ्यात विभागातील प्रा. एस. व्ही. टेकाळे, के. जी. डोलारे, प्रा. पुजा व्ही. मुंडे, आणि प्रा. ऋतुजा काळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी त्यांना व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर सर्वांसाठी अल्पोपहार आयोजित करण्यात आला. ज्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये स्नेहसंवादाचे वातावरण निर्माण झाले. समारोप प्रसंगी विभागातील सर्व प्राध्यापकांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “मोठी स्वप्ने पाहा, कठोर परिश्रम करा आणि समाजहित जपत देशाच्या प्रगतीत आपले योगदान द्या,” असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला.
शेवटी, उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, मान्यवर आणि प्राध्यापकांचे आभार मानण्यात आले. आनंद, आठवणी, सन्मान आणि प्रेरणा यांचा सुंदर संगम असलेला हा निरोप समारंभ सर्वांच्या मनात कायमस्वरूपी स्मरणात राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
जागतिक कंपन्यांमध्ये निवड झालेल्या व 2026 च्या नुकत्याच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माजी गृहमंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील,महाराष्ट्र शासनाच्या मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील, संस्थेचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा. प्रदीप पवार, विभागातील सर्व प्राध्यापकवृंदानी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले.
