धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव शहरातील आठवडी बाजार व उद्यानाच्या 18 कोटी रुपयांच्या विकास निधीस मान्यता मिळाली आहे. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही कामे मंजुर केल्याचा दावा केला आहे भाजपच्या वतीने नगराध्यक्षा नेहा काकडे यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्याचा आधार घेतला आहे. काकडे यांच्यामुळे निधी मंजूर झाला असा दावा प्रवक्ते ऍड नितीन भोसले यांनी केला आहे.यानिमित्ताने विकास काम व श्रेय वादाचा श्रीगणेशा झाला. आहे

ही विकास कामे नगर परीषद यांच्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव  यांच्यामार्फत होणार असून सदरील निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग होणार आहे. नगर परिषदेत भाजपची एकहाती सत्ता आहे. अंमलबजावणी व नियंत्रण राहावे यासाठी बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. कामाचे ई टेंडर निघणार आहे  ही कामे उत्तम गुणवत्तेची व लवकरात लवकर व्हावी अशी सामान्य नागरिकांची माफक अपेक्षा आहे. 

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच दुसऱ्याच दिवशी धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल 18 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. या निधीमुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. धाराशिव शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आधुनिक नागरी सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महत्त्वपूर्ण विकासकामांसाठी निधी मंजूर केला आहे.


शहरातील हे होणार कामे        

धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील आठवडे बाजार विकसित करण्यासाठी रक्कम 8 कोटी मंजुर करण्यात आली. शहरातील व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहे. राजमाता जिजाऊ उद्यान विकसित करण्यासाठी रक्कम 5 कोटी मंजुर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करण्यासाठी 3 कोटी मंजुर करण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान विकसित करण्यासाठी 2 कोटी मंजुर करण्यात आली. नागरिकांसाठी दर्जेदार विरंगुळा केंद्र निर्माण करण्याच्या उद्देशाने उद्यानात आकर्षक सुशोभीकरण, पादचारी मार्ग, प्रकाश व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी या प्रमाणे कामे होणार आहेत. 


 
Top