धाराशिव (प्रतिनिधी)-  पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना हा निकाल धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. पोलिसांवर दबाव असल्यामुळे तपासात अनेक त्रुटी राहिल्या, हे वास्तव असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असल्याची स्पष्ट भूमिका मांडली.

ओमराजे निंबाळकर म्हणाले की, या प्रकरणात अजूनही आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. सत्र न्यायालयाचा निकाल आमच्यासाठी निश्चितच धक्कादायक आहे. मात्र न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास कायम आहे. उच्च न्यायालयात आम्हाला दाद मिळेल, असा पूर्ण विश्वास आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग यांनी केला असल्याने पुढील कायदेशीर प्रक्रियेत सीबीआयची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. सीबीआय या निकालाबाबत काय भूमिका घेते, हे आम्ही पाहणार आहोत. त्यानंतर मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. निकालाची संपूर्ण प्रत अद्याप हातात आलेली नसल्याने त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर पुढील कायदेशीर पावले उचलण्यात येतील, असेही ओमराजे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबतच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. कोणताही राजकीय निर्णय घाईघाईने घेणार नसून तो मतदारसंघातील जनतेशी, कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला आपण अनुपस्थित राहिल्याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले.

कोर्टाच्या निकालामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्या बैठकीला उपस्थित राहता आले नाही, असे ते म्हणाले. राजकीय भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान पुढील दोन दिवसांत आपण आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे संकेतही ओमराजे निंबाळकर यांनी दिले. त्यामुळे पवनराजे हत्या प्रकरणातील पुढील कायदेशीर लढाई आणि ओमराजे यांच्या आगामी राजकीय निर्णयाकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.


 
Top