अंबेजवळगा येथे खरीपपूर्व कार्यशाळा उत्साहात ; आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यावर भर
धाराशिव दि.४ जून (जिमाका) खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पेरणीपूर्व तयारी,गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा वापर तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने आज ४ जून रोजी मौजे अंबेजवळगा येथे ग्रामस्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.मोरे व उपविभागीय कृषी अधिकारी श्री.असलकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्री.राहुल दिवाणे यांनी केले. त्यांनी गावामध्ये कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती देत खरीप हंगामात शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,असे आवाहन केले.
कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) श्री. विठ्ठल भुतेकर यांनी खरीप हंगामासाठी बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करणे,पॅकिंगवरील तपशील तपासणे तसेच दर्जेदार निविष्ठांचाच वापर करावा,याबाबत मार्गदर्शन केले.
मंडळ कृषी अधिकारी श्रीमती.गादेकर यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणीचे महत्त्व,पेरणीपूर्वी घरच्या घरी उगवण क्षमता तपासण्याची पद्धत याविषयी माहिती दिली व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.उप कृषी अधिकारी श्री.वैभव लेनेकर यांनी बीज प्रक्रियेचे महत्त्व व बीज प्रक्रिया करण्याची शास्त्रोक्त पद्धत याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित महिला शेतकऱ्यांनीही प्रत्यक्ष सहभाग घेऊन बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणीची प्रात्यक्षिके करून दाखविली.कार्यशाळेमध्ये बीबीएफ (Broad Bed Furrow) तंत्रज्ञानाद्वारे पेरणी,संतुलित खत व्यवस्थापन, मृदापरीक्षणावर आधारित खतांचा वापर, हवामान अनुकूल पीक नियोजन व शाश्वत शेती पद्धती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
तसेच फळबाग पिकांमध्ये उत्पादनवाढ, गुणवत्तावाढ व संसाधनांचा कार्यक्षम वापर साध्य करण्यासाठी सीआरए (Climate Resilient Agriculture) तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.या प्रात्यक्षिकाद्वारे बदलत्या हवामान परिस्थितीत फळबागांचे प्रभावी व्यवस्थापन,पाणी व अन्नद्रव्यांचे नियोजन आणि उत्पादन टिकवून ठेवण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
उपविभागीय कृषी अधिकारी श्री. असलकर यांनी फळबाग लागवड, नैसर्गिक शेती,आधुनिक कृषी तंत्रज्ञान,जलसंधारण,सीआरए तंत्रज्ञानाचा अवलंब तसेच प्रभावी पीक व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी गावातील तरुण शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेती क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे कौतुक केले.त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले की,खरीप हंगामामध्ये पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी करावी,शिफारशीनुसार बीज प्रक्रिया करावी,संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करावा,बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे पेरणीस प्राधान्य द्यावे तसेच फळबागांमध्ये सीआरए तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जावे.कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आधुनिक व शाश्वत शेती पद्धतींचा स्वीकार केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादकता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास निश्चित मदत होईल,असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व अधिकारी,कर्मचारी तसेच शेतकरी बांधव व भगिनी यांनी पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी करणे,बीज प्रक्रिया करणे,संतुलित खतांचा वापर करणे व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणे याबाबत सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी श्री.विठ्ठल सातपुते यांनी उपस्थित मान्यवर,अधिकारी व शेतकरी बांधवांचे आभार मानले. कार्यक्रमास गावातील प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
************