भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील घाटनांदूर येथील वसंतगड परिसरात मंगळवारी दुपारी पवन ऊर्जा प्रकल्पातील एका पवनचक्कीचा पंखा अचानक वाकला असून त्याचा काही भाग तुटून खाली पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

वसंतगडापासून अवघ्या 100 ते 200 मीटर अंतरावर संबंधित पवनचक्की उभारण्यात आली आहे. पवनचक्कीचा पंखा वाकल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेच्या वेळी परिसरात भाविक अथवा पर्यटक नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

धार्मिक स्थळांपासून सुरक्षित अंतर राखून पवन ऊर्जा प्रकल्प उभारणे अपेक्षित असताना वसंतगडासारख्या ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाच्या स्थळाजवळ पवनचक्की उभारण्यात आल्याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. महसूल विभागातील काही अधिकारी आणि संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, पवनचक्कीचा पंखा नेमका कोणत्या कारणामुळे वाकला अथवा तुटला याबाबत संबंधित कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तांत्रिक बिघाड, निकृष्ट दर्जाचे साहित्य, देखभालीतील त्रुटी किंवा अन्य कारणामुळे ही घटना घडली का, याचा सखोल तपास करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे पवन ऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या गुणवत्तेच्या निकषांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


वादळ नव्हे, झुळुकीनेच पोलखोल!

घाटनांदूर परिसरातील या घटनेनंतर सामाजिक माध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. “कोट्यवधी रुपयांच्या पवनचक्कीचा पंखा जर छोट्याशा वाऱ्यानेच वाकत असेल, तर मोठ्या वादळात काय होईल?“ असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. काहींनी तर “पवनचक्कीपेक्षा ठेकेदाराची गुणवत्ता आधीच पिचकलेली दिसते,“ अशी उपरोधिक टीकाही केली आहे.

 
Top