धाराशिव - औरा (Aura) स्पा सेंटरवर पोलिसांनी गिर्हाईक म्हणून पंटरला पाठवून धाड टाकली. या धाडीत व्यवसाय करणारे व करून घेणारे यांना रंगेहात पकडले. यावेळी पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली असून व्यवस्थापक, चालक व इतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, चार आरोपींपैकी सर्वच्या सर्व आरोपींनी पोलिसांना हुलकावणी चक्क पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली आहे. ही कारवाई प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिकाऊ पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धाराशिव शहरातील प्रशासकीय इमारती चौकातील पंजाब नॅशनल बँकेसमोरील डी.आय.सी. रोड लगत असलेल्या औरा (Aura) स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ (PITA) अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली. त्या कारवाईमध्ये शिकाऊ पोलीस उपअधीक्षक मोहिते, पोलीस निरीक्षक एम.एन. शेळके (AHTU), पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, पोलीस अंमलदार माने, दूधभाते, कंदळे, नाईकवडी, किवंडे, केवके, महिला पोलीस हवालदार पुरी, जाधव आणि चालक यांनी सहभाग घेतला. या कारवाई दरम्यान पंटरचा वापर करून खात्री करण्यात आली आणि शासकीय पंचांसमक्ष छापा टाकून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कारवाई दरम्यान औरा (Aura) स्पा सेंटरमध्ये व्यावसायिक लैंगिक शोषण (वेश्या व्यवसाय, अनैतिक देह व्यापार) सुरू असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी स्पा सेंटरचे व्यवस्थापक क्षितीज काकासाहेब मोरे चालक ओंकार अण्णासाहेब चोरमले, अजित धोंडीराम लोमटे आणि रोहित रवींद्र गिरी या आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ कलम ३, ४, ५ अन्वये धाराशिव शहरातील आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये एकूण ५ महिलांची सुटका (Rescue) करण्यात आली असून त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
अवैध व्यवसायांत सामील असलेल्या घटकांची गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलीस अधीक्षक खोखर यांनी दिला आहे.