उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणूक: ७ अपक्षांची माघार; आता महेश देशमुख विरुद्ध बसवराज पाटील अशी दुरंगी लढत
धाराशिव:
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणातून तब्बल ७ अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. आज (दि. ४ जून) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला होता. बंडखोरांना आणि अपक्षांना थंड करण्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आले असून, आता या निवडणुकीत महाविकास आघाडीचे (काँग्रेस) महेश देशमुख आणि महायुतीचे (भाजप) बसवराज पाटील यांच्यात थेट आणि चुरशीची दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी मागे घेतलेले उमेदवार पुढीलप्रमाणे:
आज नाट्यमय घडामोडींनंतर दोन्ही बाजूंच्या प्रमुख बंडखोरांसह ७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. यात प्रामुख्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि भाजपशी संबंधित स्थानिक नेत्यांचा समावेश आहे.
मिलिंद गणपती महालिंगे (चाकूर - अपक्ष)
अर्चना विनोद गंगणे (तुळजापूर - अपक्ष): भाजपचे तुळजापूर येथील नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या त्या पत्नी तथा माजी नगराध्यक्ष आहेत.
शरद रामभाऊ यादव (माजलगाव - अपक्ष)
अहमदखान सय्यद नूर राज सय्यद (माजलगाव - अपक्ष)
संजय पांडुरंगजी मुंदडा (कळंब - अपक्ष): ठाकरे सेनेचे नगरसेवक तथा कळंब नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते.
सचिन भारतराव पवार (धाराशिव - अपक्ष): धाराशिव नगरपालिकेतील ठाकरे सेनेचे नगरसेवक.
सहालबिन आमेर चाऊस (माजलगाव - अपक्ष) यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यामध्ये समावेश आहे