भूम, (प्रतिनिधी)- आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भूम तालुक्यातील सरमकुंडी फाटा ते वारदवाडी फाटा या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा वारकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशारा भूम तालुका वारकरी बांधवांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत वारकरी चळवळ प्रमुख ह.भ.प. योगेश आसलकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील प्रमुख पालखी सोहळ्यांपैकी संत मुक्ताबाई पालखी सोहळा तसेच श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानची दिंडी दरवर्षी भूम तालुक्यातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करते. आषाढी एकादशीनंतर परतीच्या प्रवासातही हजारो वारकरी, भाविक, दिंडी प्रमुख व साधुसंत याच मार्गाचा वापर करतात. मात्र सरमकुंडी फाटावारदवाडी फाटा या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वारकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच दिंडीतील वृद्ध, महिला आणि लहान मुलांना या खराब रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पालखी मार्गाची तात्काळ दुरुस्ती करून वारकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. वारकरी बांधवांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून या कालावधीत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास भूम गोलाई चौकात शेकडो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात संतांच्या विचारांनी प्रेरित शांततामय आंदोलन छेडतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, भूम तसेच उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूम यांना देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर हभप. योगेश आसलकर यांच्यासह नवनाथ रोकडे, श्याम बागडे, अभिजीत टकले, अतुल उपरे, राम बाबर,अर्जुन शिंदे व इतर वारकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. वारकऱ्यांच्या मागणीमुळे पालखी मार्गाच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
