धाराशिव (प्रतिनिधी)-  देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी री नीट 2026 परीक्षा रविवारी धाराशिव शहरातील पाच केंद्रांवर शांततेत,शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पार पडली. वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडविण्याचे स्वप्न बाळगलेल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा निर्णायक असल्याने सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत घेण्यात आली.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला होता.  जिल्ह्यातील पाच परीक्षा केंद्रांवर एकूण 2072 परीक्षार्थी नोंदणीकृत होते.त्यापैकी 1897 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 175 परीक्षार्थी गैरहजर राहिल्याची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील उपस्थितीचे प्रमाण सुमारे 91.55 टक्के राहिले. परीक्षा केंद्रनिहाय पाहता,श्रीपतराव भोसले हायस्कूल,तांबरी विभाग येथे 720 पैकी 657 विद्यार्थी उपस्थित होते,तर 63 गैरहजर राहिले.रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,बार्शी रोड येथे 480 पैकी 446 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.शासकीय तंत्रनिकेतन,तुळजापूर रोड येथे 360 पैकी 326,छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,तांबरी विभाग येथे 288 पैकी 264,तर जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे 224 पैकी 204 विद्यार्थी उपस्थित होते.

परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि गैरप्रकारमुक्त राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले होते.सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेख, व्हिडिओग्राफी,बायोमेट्रिक पडताळणी, फ्रिस्किंग व्यवस्था,पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा नोडल अधिकारी विद्याचरण कडवकर तसेच सीआरपीएफचे सहाय्यक कमांडंट सिद्धार्थ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पार पडली.

 
Top