धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार खते व बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांना सूचना देणे बाबत जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन देण्यात आले.
कृषी सेवा केंद्रांवर दर्जाहीन, निकृष्ट दर्जाचे बियाणे व खते विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत आपण तुळजापूर तालुक्यात केलेल्या कार्यवाहीचे आम्ही अभिनंदन करतो.परंतु केवळ शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर धाड टाकण्यापेक्षा, सरसकट सर्व तालुक्यांमध्ये नियमित व अनियमित तपासण्या करण्यासाठी आपण सर्व तालुका कृषी अधिकारी यांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी विनंती आहे.
यासोबतच खालील उपाययोजना करण्याची विनंती केली.या उपाय योजनेमध्ये.
शेतकऱ्याच्या मागणीनुसारच खते बियाणे देऊन त्याचा दर हा एमआरपी नुसार आकारण्यात यावा. एम आर पी पेक्षा चढ्या भावाने विक्री करणारावर व विनाकारण दुसरी वस्तू घेण्यास भाग पडणारावर कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात याव्या. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ऑनलाइन व ऑफलाइन तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करणे.या सुविधेची माहिती आपल्या सहाय्यकांमार्फत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध करणे. काही कृषी सेवा केंद्रांवर बियाणे खरेदी करताना दुकानदार त्यांना जे खत किंवा औषध विकायचे आहे तेच घेण्यासाठी बंधन करतात त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. यावरही कारवाई करावी. वरील उपाययोजनांमुळे शेतकरी अधिक जागरूक राहतील आणि अडचण उद्भवल्यास तात्काळ तक्रार करतील. त्यामुळे फसवणूक रोखण्यास मदत होईल व शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल.
कृपया आपल्या स्तरावरून तालुका अधिकाऱ्यांना योग्य त्या कडक सूचना देऊन शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावे. यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उमेश राजेनिंबाळकर,धनंजय राऊत,ऍड जावेद काझी,सर्फराज काझी,अभिषेक बागल,शिवाजी गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
