धाराशिव (प्रतिनिधी)-  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धाराशिव शाखेच्या वतीने सोमवार, दिनांक २२ जून २०२६ रोजी व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारच्या सत्रात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या १०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच आगामी वर्ष २०२६-२७ साठी अभाविपच्या नूतन धाराशिव शहर कार्यकारिणीची अधिकृत घोषणा ही करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर अभाविपचे धाराशिव शहर अध्यक्ष प्राध्यापक प्रशांत गुरव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करत भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी सभागृह भारावून गेले होते. 

या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आदित्य सुधीर पाटील उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले व त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या मुख्य सत्रात, अभाविपच्या कार्यकर्त्या प्रतीक्षा शिनगारे यांनी सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. धाराशिव शहरातील आणि परिसरातील १०वी व १२वीच्या १०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे अभाविप धाराशिव शाखेने स्पष्ट केले. यानंतर शहर मंत्री साक्षी पाटील यांनी 'मंत्री प्रतिवेदन' सादर करत वर्षभरातील विद्यार्थी परिषदेच्या कामाचा आढावा मांडला.

याचवेळी वर्ष २०२६-२७ च्या नूतन कार्यकारिणीची घोषणा देखील करण्यात आली. आगामी वर्ष २०२६-२७ साठीच्या नूतन शहर कार्यकारिणी घोषणेची जबाबदारी निर्वाचन अधिकारी म्हणून ॲड. निखिल सतीश शेंडगे यांनी  पार पाडली. यामध्ये अभाविप धाराशिव शाखेचे शहराध्यक्ष म्हणून  प्रा. प्रशांत गुरव यांचे पुनर्निर्वाचन करण्यात आले, तर नवनिर्वाचित शहर मंत्री म्हणून भार्गव मंजुळे यांची घोषणा करण्यात आली. यानंतर उर्वरित शहर कार्यकारिणीची घोषणा शहर अध्यक्षांनी केली. नवनिर्वाचित शहर मंत्री भार्गव मंजुळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत आगामी काळात विद्यार्थी हितासाठी आणि शैक्षणिक चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.

उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला धाराशिव शहरातील बहुसंख्य विद्यार्थी, पालक आणि अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top