शेतकरी, बेरोजगार आणि स्थानिक प्रश्न सोडविणार
मविआचे उमेदवार महेश देशमुख यांची माहिती
धाराशिव, दि. 1 -
पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस होत असलेली दरवाढ, बेरोजगारी आणि शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम काँग्रेसने सातत्याने केले आहे, परंतु सत्ताधार्यांनी आजपर्यंत काहीही न करता केवळ अराजकता वाढवून ठेवली आहे. त्यामुळे या निवडणुकीत संख्याबळाला महत्व न देता जनसेवेसाठी आपल्याला संधी मिळेल, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून महेश देशमुख यांनी सोमवारी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जीवन गोरे, लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे, डॉ. स्मिता शहापूरकर, माजी शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, नगरपालिकेतील गटनेते खलीफा कुरेशी यांची उपस्थिती होती.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत महेश देशमुख म्हणाले की, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, पक्षश्रेष्ठींसह लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. देशातील अराजक परिस्थितीत काँग्रेस पदाधिकार्यांकडून जनसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. तरीही सत्ताधार्यांच्या कामात सुधारणा होत नाहीत.
माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे म्हणाले की, कुठल्याही निवडणुका संख्याबळावर विजयी होता येत नाहीत. विधान परिषद निवडणुकीत आजवर उमेदवार कोण आहे? याचा विचार करून मतदार आपले मत देतात. या निवडणुकीत घोडेबाजार होत नाही, मतदार सुशिक्षीत आहेत, त्यामुळे महेश देशमुख यांना बळ मिळेल, असा विश्वास आहे.
.jpeg)