नागरी सुविधा मिळण्यासाठी लक्ष घालणार

महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांची ग्वाही



 धाराशिव, दि. 1 -

धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीकडून आपल्याला विधानपरिषदेवर जाण्याची संधी मिळाली आहे. मतदार संघातील नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सामान्यांना मुलभूत आणि नागरी सुविधा मिळण्यासाठी लक्ष घालून तत्परतेने काम करेन, अशी ग्वाही उमेदवार बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांनी सोमवारी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, अरविंद पाटील निलंगेकर उपस्थित होते. त्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर, ओमप्रकाश शेटे, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अ‍ॅड. नितीन भोसले उपस्थित होते. 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी आणि जनसेवेची पुन्हा संधी दिली आहे. देशात आणि राज्यात भाजपाला मिळत असलेले लोकांचे समर्थन ही विकासकामांची पावती आहे. तोच धागा पकडून मतदारसंघातील ज्या-त्या भागातील नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या माध्यमातून जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण काम करणार आहे. नागरी आणि मुलभूत सुविधांच्या माध्यमातून सर्वांना अपेक्षित काम करण्याचा संकल्प बसवराज पाटील यांनी व्यक्त केला. 


नाराजी नाही; पक्षीय पद अनन्यसाधारण ः जिल्हाध्यक्ष कुलकर्णी

विधानपरिषदेसाठी बसवराज पाटील यांच्याप्रमाणे आपणही उमेदवारी मागीतली होती. परंतु पक्षश्रेष्ठींच्या आवाहनाचा मान ठेवून आपण राज्यातील 17 जागांपैकी धाराशिवची जागा सर्वाधिक मतांनी विजयी होण्यासाठी काम करणार आहे. मतदारसंघातील 988 पैकी 635 जागा महायुतीच्या आहेत. 107 अपक्षांपैकी 85 जण आपल्यासोबत आहेत. त्यामुळे किमान 750 ते 800 मते बसवराज पाटील हे घेतील आणि सर्वाधिक मतांनी विजयश्री मिळवतील, याची खात्री आहे. 18 तारखेला तिन्ही जिल्ह्यातील 29 बुथवर होणार्‍या मतदान प्रक्रियेसाठी सर्व कार्यकर्त्यांनाही आपण आवाहन केले असून भाजपचा विजय निश्चित आहे. एकंदरीत उमेदवारी न मिळाल्याने आपली अजिबात नाराजी नाही, आपल्याकडे असलेली पक्षीय पदेच अनन्य साधारण आहेत, असे स्पष्टीकरण देत जिल्ह्यात सुरू असलेल्या नकारात्मक चर्चेला जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी पूर्णविराम दिला.

 
Top