२५ ते २८ वर्षे सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा एसटी आगारात गौरव



भूम - प्रतिनिधी

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भूम आगारातील दीर्घकाळ प्रामाणिक व निष्ठेने सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात २८ वर्षे सेवा पूर्ण केलेले वाहक बी. एस. गायकवाड, २२ वर्षे सेवा पूर्ण केलेले वाहक डी. पी. गजरे तसेच २५ वर्षे सेवा बजावलेले हेड मेकॅनिक बाजीराव जगदाळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

दीर्घकाळ प्रवाशांच्या सेवेत कार्यरत राहून एसटी महामंडळाच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या सेवाकाळातील कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यांचा यावेळी उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उल्हास शिनगारे उपस्थित होते. तसेच स्थानक प्रमुख श्रीकांत सुरवसे, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष महेश शिंदे, सचिव वैभव हराळ यांनी मनोगत व्यक्त करताना सत्कारमूर्तींच्या कार्याचा आढावा घेत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सत्कारमूर्तींनी आपल्या सेवाकाळातील अनुभव कथन करताना सहकारी कर्मचारी, अधिकारी आणि प्रवाशांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमास नातेवाईक, एसटी कर्मचारी व विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वातावरण भावनिक व आनंददायी झाले असून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सत्कारमूर्तींचा गौरव केला. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

 
Top