शिक्षण हेच उज्ज्वल भवितव्याचे प्रभावी साधन – अॅड. व्यंकट गुंड पाटील
रुपामाता इरा इंटरनॅशनल स्कूल, सांजा रोड, धाराशिव येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी व पालकांचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शिक्षण हे केवळ नोकरी किंवा व्यवसाय मिळविण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, संस्कार, आत्मविश्वास आणि समाजात सन्मानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन यावेळी संस्थेचे संस्थापक तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. व्यंकट गुंड पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना केले. ज्ञानाच्या बळावरच विद्यार्थी आपल्या जीवनातील ध्येय गाठू शकतात, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित अभ्यास, शिस्त आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर यश संपादन करावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळेच्या प्रवेशद्वारावर विशेष स्वागताची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या व इतर सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व टाळ्यांच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील विविध उपक्रम, शिस्त, अभ्यासाचे महत्त्व तसेच शाळेच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन करून नवोदितांचा परिचय करून देण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सर्वपल्ली अरुणजीवनकुमार यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देताना नियमित उपस्थिती, वेळेचे नियोजन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांशी जवळीकीने संवाद साधून त्यांच्यात नवीन वर्षासाठी आत्मविश्वास निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
यावेळी मुख्याध्यापक सर्वपल्ली अरुणजीवनकुमार, उपमुख्याध्यापक व्ही. ए. पिंपरकर, रुपामाता परिवारातील गजानन पाटील, अनिकेत नवले, हर्षल मोहिते तसेच हेड मॅनेजर ए. व्ही. ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. दीर्घ सुट्टीनंतर शाळेत परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्सुकता आणि पालकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा स्वागत सोहळा अत्यंत संस्मरणीय ठरला. याप्रसंगी मोठ्या संख्येने पालक, शिक्षकवृंद, सहशिक्षक, कार्यालयीन कर्मचारी, सेवकवर्ग तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.