तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सांगवी-मार्डी येथे सापडलेल्या निकृष्ट दर्जाच्या धान्यप्रकरणी पुरवठा विभागाने पंचनामा केला असून, या प्रकरणामुळे शिधावाटप व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोदामपाल आणि पुरवठा विभागाच्या अधिकारी कोळगे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

याबाबत बोलताना नायब तहसीलदार कोळगे यांनी, “फक्त एका पोत्यामध्ये खराब माल आढळून आला. वरचा आणि खालचा माल चांगल्या दर्जाचा होता. मध्येच काही प्रमाणात माल खराब असल्याचे दिसून आले,“ अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, या गोदामातून रास्तभाव दुकानांना धान्य पाठविताना प्रत्येकी एक ते दोन किलो धान्य कमी मिळत असल्याच्या तक्रारीही सातत्याने समोर येत आहेत. यासंदर्भात विचारले असता, “याबाबत नागरिकांनी अथवा दुकानदारांनी लेखी तक्रार करावी. प्राप्त तक्रारींची निश्चित दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल,“ असे कोळगे मयांनी स्पष्ट केले.

मात्र, संबंधित गोदामपालाकडे सातत्याने विविध कामे पडत असल्याने अनेक रास्तभाव दुकानदार गोदाम व्यवस्थापनाविरोधात उघडपणे तक्रार करण्यास धजावत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि संपूर्ण धान्य वितरण व्यवस्थेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिक आणि लाभार्थ्यांकडून होत आहे. सांगवी-मार्डी येथे आढळलेल्या निकृष्ट धान्याच्या घटनेमुळे पुरवठा विभागाची कार्यपद्धती पुन्हा चर्चेत आली असून, आता या प्रकरणात विभागाकडून नेमकी कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 
Top