तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यात खाजगी शाळांकडे पालकांचा ओढा वाढत असतानाच शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बाब समोर आली आहे. माळुंब्रा येथील काही जबाबदार लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन कदमवाडी येथील तब्बल 17 विद्यार्थ्यांना माळुंब्रा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश मिळवून दिला. मात्र नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही या विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली नसल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, तालुक्यातील काही खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रथम पुस्तके वितरित करण्यात आल्याचा आरोप होत असून, त्यामुळे शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तुळजापूर तालुक्यात सुमारे 80 टक्के पुस्तकांचे वाटप पूर्ण झाल्याचा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला असला तरी जिल्हा परिषद शाळांतील अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही पुस्तकांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.
सध्या तालुक्यात खाजगी शाळांची संख्या आणि त्यांच्याकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या घटत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. यामागे शैक्षणिक व्यवस्थेतील बेजबाबदारपणा आणि जिल्हा परिषद शाळांकडे होणारे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी शासन व लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असताना शैक्षणिक साहित्य वितरणात खाजगी शाळांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असून शिक्षण व्यवस्थेतील समतेच्या तत्त्वालाच धक्का बसत असल्याची भावना पालकांमधून व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुस्तक वाटपात कोणताही भेदभाव झाला असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमाने पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
गजानन वडने यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “जिल्हा परिषद शाळा या सर्वसामान्यांच्या हक्काच्या शाळा आहेत. त्यांचा दर्जा आणि गुणवत्ता टिकवणे अत्यंत गरजेचे आहे. खाजगी शाळांना आधी आणि जिल्हा परिषद शाळांना नंतर पुस्तके देणे ही चुकीची व भेदभाव करणारी बाब आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना प्राधान्याने शैक्षणिक पुस्तके वाटप करण्यात यावीत.