तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
‘
तुळजापूर -
श्री तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षा आणि दर्शन व्यवस्थेतील कथित गंभीर त्रुटींवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. काही विशिष्ट व्यक्तींना थेट चोपदार द्वारापर्यंत प्रवेश दिला जात असून त्यामुळे सामान्य भाविकांच्या शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थेचा भंग होत असल्याचा गंभीर आरोप श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुजारी मंडळाच्या अध्यक्षांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. मंदिर संस्थानाकडून खासगी सुरक्षा रक्षकांसह कायमस्वरूपी कर्मचारी नेमण्यात आलेले असतानाही दर्शन रांगा आणि गाभारा परिसरात शिस्त नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, काही विशिष्ट व्यक्ती आणि भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून थेट गाभाऱ्यातील चोपदार दरवाजा पर्यंत दर्शनासाठी सोडले जात आहे. त्यामुळे तासन्तास रांगेत उभ्या असलेल्या सामान्य भाविकांन साधी देवीचे दर्शनी घडत नाही
विशेष म्हणजे हा प्रकार नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे. यामध्ये सुरक्षा कंपनीचे कर्मचारी किंवा मंदिर संस्थानातील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गाभाऱ्या पर्यत केवळ अधिकृत पुजारी आणि अधिकार असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्याची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्षात या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.