खड्डे चुकवताना दोन कारची समोरासमोर धडक; महामार्गाच्या दुरवस्थेचा फटका
भातंब्रीजवळील घटना; रस्ता दुरुस्तीच्या रखडलेल्या कामावरून नागरिक संतप्त
तुळजापूर, प्रतिनिधी :
तुळजापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील भातंब्री गावासमोर खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भातंब्री गावासमोरील महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे गावातील सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याने रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली असून सतत मोठमोठे खड्डे निर्माण होत आहेत. स्थानिकांच्या मते, सांडपाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था केल्यास रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
दरम्यान, याच खड्ड्यांना चुकवण्याच्या प्रयत्नात दोन कार एकमेकांसमोर आल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता.
तुळजापूर-अक्कलकोट महामार्गाच्या दुरुस्तीचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे हा मार्ग खड्डेमय व धोकादायक बनला असून येथे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर भातंब्री ग्रामपंचायत आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणीही पुढे येत आहे.
स्थानिक नागरिकांनी महामार्ग प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने अपघातांची मालिका सुरूच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
भाविक, प्रवासी तसेच व्यापारी वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा तुळजापूर-अक्कलकोट महामार्ग सध्या खड्ड्यांमुळे धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
खड्डे बुजवणार कधी?
भातंब्रीजवळ झालेल्या या अपघातानंतर संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन महामार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला