खोंदला ग्रामस्थांचा संताप अनावर! भर उन्हात महिला-पुरुषांचे पांदण रस्त्यासाठी आंदोलन
कळंब प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील खोंदला येथे तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेला पांदण रस्ता अद्यापही अपूर्ण अवस्थेत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी भर उन्हात महिला व पुरुषांसह थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले. रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या या रस्त्याचे काम पूर्ण न करता ठेकेदाराने निधी उचलल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता वर्षानुवर्षे रखडल्याने शेतात जाणे-येणे कठीण झाले आहे. अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर ग्रामस्थांचा संयम सुटला आणि त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केले.
आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस व महसूल प्रशासन दुपारनंतर घटनास्थळी दाखल झाले. महसूल प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार गोकुळ भराडिया यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याचे काही काम त्यांनी स्वतःच्या श्रमातून पूर्ण केले आहे. मात्र कागदोपत्री हे काम रोजगार हमी योजनेतून पूर्ण झाल्याचे दाखवून संबंधित ठेकेदाराने निधी उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर झाला का, असा सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील हे काम असतानाही संबंधित अभियंते तीन वर्षांत एकदाही पाहणीसाठी फिरकले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याबाबत विचारणा केली असता काही अधिकाऱ्यांनाच रस्ता पूर्ण आहे की अपूर्ण, याची माहिती नसल्याचे समोर आल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
"रस्ता नाही, तर शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष आहे; ठेकेदार, अधिकारी आणि संबंधित विभागाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी," अशी मागणी आंदोलक ग्रामस्थांनी केली आहे.
खोंदला येथील या आंदोलनामुळे रोजगार हमी योजनेतील कामांच्या दर्जाबाबत आणि देखरेखीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
