अहमदिया मुस्लिम युवक संघाचा वार्षिक इज्तेमा संपन्न; विजेत्यांचा गौरव, रक्तदात्यांचा सन्मान
धाराशिव : प्रतिनिधी
मजलिस खुद्दामुल अहमदिया उस्मानाबाद (अहमदिया मुस्लिम युवक संघ) यांच्या वतीने दिनांक 30 व 31 मे रोजी वार्षिक इज्तेमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या दोन दिवसीय कार्यक्रमात खुद्दाम (युवक) व अत्फाल (लहान मुले) यांनी विविध क्रीडा, शैक्षणिक आणि आध्यात्मिक स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला.
इज्तेमाच्या पहिल्या दिवशी मैदानावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कुरआन पठण, भाषण, कविता सादरीकरण, प्रश्नमंजुषा तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सहभागींच्या बौद्धिक क्षमतेस चालना देण्यासाठी ज्ञानवर्धक प्रदर्शनीही भरविण्यात आली होती. या प्रदर्शनीत विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक विषयांवरील माहिती आकर्षक स्वरूपात मांडण्यात आली.
30 मे रोजी सकाळी खिदमते खल्क विभागामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराला महिला व पुरुष रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदात्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या उपक्रमासाठी डॉ. शैलेंद्र चौहान, डॉ. विवेक कोळगे, डॉ. दीपमाला मॅडम, विठ्ठल कांबळे, नगरसेवक सिद्धार्थ दादा बनसोडे, विष्णू गलांडे, नीलाक्षी जानराव, आशाताई कांबळे, अविनाश रणखांब, तिरुपती केंद्रे, जाकीर शेख, गणेश साळुंखे तसेच शेख रौफ यांनी मोलाचे सहकार्य केले. रक्तदान करणाऱ्यांमध्ये तारिक अहमदी, अब्दुल कय्यूम नासिर, मुदस्सर अहमद, शुभम मुंजळे, मोमिन अब्दुस सलाम, सादिका अंबर, अमतुल अलीम, नदीम अहमद, रागेब अलीम आदींचा समावेश होता.
31 मे रोजी सायंकाळी इज्तेमाचा समारोप सोहळा उत्साहात पार पडला. विविध क्रीडा व शैक्षणिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींचा ट्रॉफी, पदके व प्रमाणपत्रे प्रदान करून सन्मान करण्यात आला. या समारोप कार्यक्रमातून शिस्त, बंधुभाव, सेवा आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या वार्षिक इज्तेमात अहमदिया मुस्लिम युवक संघाचे जिल्हाध्यक्ष रागेब अलीम, शहराध्यक्ष नदीम अहमद, अध्यक्ष जमात अब्दुल समद, डॉ. बशारत अहमद, अब्दुल लतीफ, अब्दुल अलीम, प्रचारक मकबूल अहमद, प्रचारक काझी उस्मान पाशा (सोलापूर), इल्यास अहमद, मुदस्सर अहमद, अब्दुल नईम, शहरयार अहमद, सजील अहमद, आदिल अहमद, मुताहर अहमद, तौसिफ अहमद, माजीन अहमद, शफीक अहमद, मंजूम अहमद,सफदर अहमद, फारीस अहमद तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.