धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकराजा, राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी प्राचार्य डॉ.अंबादास मंजुळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षण ,सामाजिक न्याय, समता आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक समतेची मूल्ये जोपासणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.

ते पुढे म्हणाले की, शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानून बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे छत्रपती शाहू महाराज यांनी खुली केली. त्याचप्रमाणे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी देखील बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची दारे खुली केली आहेत. आणि आज बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचली आहे असे ते म्हणाले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.विवेकानंद चव्हाण यांनी केले.तर आभार कनिष्ठ विभागातील स्टाफ सेक्रेटरी सचिन चव्हाण यांनी मानले.  सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास मंजुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top