वाशी (प्रतिनिधी)- तब्बल सात वर्षांपूर्वी घडलेल्या कथित मारहाण प्रकरणात वाशी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सरकार पक्षाकडून सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब आरोपींना दोषी ठरविण्यासाठी पुरेसे नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत हा निर्णय दिला.
प्राप्त माहितीनुसार, इंदापूर (ता. वाशी) येथील सीमा सुरेश गपाट यांनी 20 मार्च 2019 रोजी वाशी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीत 18 मार्च 2019 रोजी झालेल्या वादातून राजेंद्र बाबासाहेब गपाट, बाबासाहेब नागनाथ गपाट, पंडित नरहरी गपाट, विजय नरहरी गपाट, चंद्रकांत एकनाथ गपाट, दमयंती चंद्रकांत गपाट, छाया विजय गपाट, छनुबाई बाबासाहेब गपाट यांच्यासह अन्य आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीच्या आधारे वाशी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 147, 148, 325, 323, 504, 506 सह 149 अन्वये गुन्हा दाखल करून तपास पूर्ण केला. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आणि खटल्याची सुनावणी सुरू झाली. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने साक्षीदार तपासले. मात्र त्यांच्या जबाबांमध्ये अनेक विसंगती असल्याचे तसेच आरोपींविरुद्धचे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याचे आरोपींचे विधिज्ञ ॲड. पी. के. कोठावळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. साक्षीपुरावे आणि घटनाक्रमातील त्रुटींवर त्यांनी सविस्तर युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार केल्यानंतर न्यायालयाने आरोपींविरुद्धचा गुन्हा सिद्ध होत नसल्याचा निष्कर्ष नोंदवत 25 जून 2026 रोजी सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. पी. के. कोठावळे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना ॲड. अमोल कवडे आणि ॲड. प्रीती जगदाळे यांनी सहकार्य केले. न्यायालयाच्या या निर्णयाची परिसरात चर्चा होत असून आरोपी पक्षाने निकालाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
