भूम (प्रतिनिधी)- शेगाव-पंढरपूर भक्ती रेल्वे मार्गाला तातडीने मंजुरी मिळावी, यासाठी आता सर्वपक्षीय पातळीवर एकजूट होत असून जनआंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार रेल्वे कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. भूम येथील गजानन महाराज (मठ) मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध पक्षांचे पदाधिकारी, कृती समितीचे सदस्य आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
बैठकीत ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिकांकडून रेल्वे मार्गाच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करून ते राज्य शासन व रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांचा अधिकृत पाठिंबा मिळवून या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गासाठी प्रशासनावर दबाव वाढविण्याची रणनीती आखण्यात आली. यावेळी उपस्थितांनी रेल्वे मार्ग मंजुरीसाठी जनसहभाग वाढविणे, लोकप्रतिनिधींशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याच्या सूचना मांडल्या. पुढील टप्प्यात वाशी व परंडा येथेही अशाच बैठका घेऊन आंदोलन आणखी व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विशेष म्हणजे, धाराशिव जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन शेगावपंढरपूर रेल्वे मार्गाला तातडीने मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे रेल्वे कृती समितीने स्पष्ट केले. रेल्वे मार्गासंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्वपक्षीय सहकार्य आवश्यक असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, भाजपचे सुरेश बाप्पा कवडे, नवनाथ जगताप, विशाल ढगे, तानाजी पाटील, संतोष वरळे, सुरज गाढवे, फैजान काझी, भाऊसाहेब मारकड, निलेश शेळवणे, बालाजी काळे, गजानन सोलंकर, मधुकर अर्जुन, ॲड. धनंजय पाटील, ॲड. पंडित ढगे, मोईज सय्यद, संतोष सुपेकर, ॲड. सिराज मोगल, यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, रेल्वे कृती समितीचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
