धाराशिव (प्रतिनिधी)- खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच दुसऱ्याच दिवशी धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नाने यश मिळाले असून राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल 18 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. या निधीमुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक सुविधा अधिक सक्षम व आधुनिक होणार आहेत.
धाराशिव शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आधुनिक नागरी सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महत्त्वपूर्ण विकासकामांसाठी निधी मंजूर केला आहे.
मंजूर निधीतून खालील विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत
धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील आठवडे बाजार विकसित करण्यासाठी रक्कम 8 कोटी मंजुर करण्यात आली. शहरातील व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहे. राजमाता जिजाऊ उद्यान विकसित करण्यासाठी रक्कम 5 कोटी मंजुर करण्यात आली.नागरिकांसाठी दर्जेदार विरंगुळा केंद्र निर्माण करण्याच्या उद्देशाने उद्यानात आकर्षक सुशोभीकरण, पादचारी मार्ग, प्रकाश व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी तसेच पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करण्यासाठी रक्कम रु. 3 कोटी मंजुर करण्यात आली. शहरातील युवक, ज्येष्ठ नागरिक व कुटुंबांसाठी आधुनिक स्वरूपाचे उद्यान विकसित करण्यात येणार असून हरित क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान विकसित करण्यासाठी रक्कम रु. 2 कोटी मंजुर करण्यात आली. उद्यानाचे सुशोभीकरण, आकर्षक प्रकाश व्यवस्था, बैठकीची व्यवस्था, व्यायाम साधने व इतर नागरी सुविधा निर्माण करून हे उद्यान नागरिकांसाठी अधिक उपयुक्त होणारआहे. कामांमुळे धाराशिव शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. शहरातील सौंदर्य वाढणार आहे.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले की, “धाराशिव शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेत 18 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शहराच्या विकासाला मोठी चालना मिळेल. भविष्यातही धाराशिव जिल्ह्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.“
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या निधीस मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मांडले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले आहेत. या निर्णयामुळे धाराशिव शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून, शहरातील विविध स्तरांतून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. सदरील विकास कामे ही नगर परीषद यांच्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव यांच्यामार्फत होणार असून सदरील निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग होणार आहे.
