जनतेच्या विविध प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; तातडीच्या उपाययोजनांची मागणी.डॉ.प्रतापसिंह पाटील
धाराशिव : जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये मूलभूत सुविधा, शासकीय योजनांमधील अडचणी तसेच जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध लोकहिताच्या विषयांचा समावेश होता.
वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किमती, बेरोजगारीची गंभीर समस्या, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, रखडलेली विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, वीज व महसूल विभागाशी संबंधित प्रश्न याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे नागरिकांना होणारा मनस्ताप दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची नावे वगळली जाणे, केवायसी प्रक्रियेतील अडथळे आणि त्यामुळे अनेक महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून देण्यात आली. पात्र महिलांना कोणत्याही प्रक्रियात्मक त्रुटींचा फटका बसू नये व त्यांना योजनेचा अखंडित लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (श.प) जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, मसूद शेख, नगरसेवक बबलूभाई शेख, पंकज भोसले, सर्फराज कुरेशी, एजाज काझी, विशाल शिंगाडे, सुनील आंबेकर, अन्वरभाई शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.