भूम तालुक्यातील ईट मध्ये सासऱ्याचे जावयाला 'शाही' आंदण; पार्सलच्या नावाखाली थेट सिंधी घोडी दारात!
भूम
सासरा-जावईच्या नात्यातील गोडवा वाढवणारी आणि पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरलेली एक 'शाही' घटना भूम तालुक्यातील ईट येथे घडली आहे. लग्नात राहिलेली हौस धोंड्याच्या महिन्यात पूर्ण करत वाशी तालुक्यातील पारा येथील सासरे विलास झांबरे यांनी आपले जावई क्रांतीसिंह राऊत यांना सरप्राईज गिफ्ट म्हणून चक्क *लाखमोलाची देखणी सिंधी घोडी भेट दिली आहे.
'पार्सल आलंय' म्हणत दिला सुखद धक्का
झाले असे की, विलास झांबरे यांनी जावई क्रांतीसिंह राऊत यांना फोन लावला. "तुमच्या ईट येथील घरी शेत उपयोगी साहित्याचे पार्सल आले आहे, तेवढं उतरून घ्या," असा निरोप दिला. सासऱ्यांचा फोन... त्यात 'शेती उपयोगी साहित्य'... क्रांतीसिंह यांना वाटले, नांगराचा फाळ असेल नाहीतर एखादे नवे अवजार आले असेल.
मात्र, घरी पोहोचताच त्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दारात पांढरीशुभ्र, रेवाळ चाल चालणारी, डौलदार सिंधी घोडी उभी होती! शेतीच्या अवजाराऐवजी थेट 'अश्व' आल्याचा सुखद धक्का क्रांतीसिंह यांना बसला आणि क्षणात त्यांचा चेहरा आनंदाने फुलला.
लॉकडाऊनच्या लग्नाची 'रॉयल' भरपाई
या अनोख्या भेटीमागची भावना तर आणखीनच हृदयस्पर्शी आहे. विलास झांबरे म्हणाले, "मुलीचे लग्न लॉकडाऊनच्या काळात अगदी घाईगडबडीत, मोजक्या लोकांत झाले. तेव्हा मनासारखा थाटमाट करता आला नाही. ती रुखरुख मनात होती. आता अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना सुरू आहे. या महिन्यात लेक-जावयाला गोडधोड करून सोन्याची अंगठी देतात. पण पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि जावयाला असलेली घोड्यांची प्रचंड आवड
'इमानदार' सिंधी घोडीची निवड का?
सिंधी, मारवाडी, काटेवाडी... घोड्यांच्या अनेक जाती. पण झांबरे यांनी सिंधी घोडीच का निवडली? यामागेही एक खास कारण आहे. "सिंधी घोडीचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे घोडेस्वार चुकून खाली पडला तरी ही जात पुढे पळून जात नाही. जागेवरच 'ब्रेक' लावून थांबते. एकदम इमानदार आणि प्रेमळ," असे झांबरे यांनी सांगितले.
ही कल्पना डोक्यात पक्की झाल्यावर त्यांनी साळेगावचे प्रसिद्ध घोडे व्यापारी सलमान काझी यांच्याकडे जाऊन अनेक घोडी पाहिल्या. शांत स्वभावाची, सांगितलेल्या गुणांची घोडी पसंत पडताच क्षणाचाही विलंब न करता, कोणालाही थांगपत्ता लागू न देता व्यवहार पूर्ण केला आणि 'पार्सल' प्लॅन तयार झाला."आयुष्यभर जपेन" - भारावलेल्या जावयाची प्रतिक्रिया*
या शाही भेटीने भारावून गेलेल्या जावई क्रांतीसिंह राऊत म्हणाले, "सासरेबुवांनी दिलेलं हे आंदण अनमोल आहे. मला लहानपणापासून घोड्यांची आवड. सासऱ्यांनी ती ओळखून इतकी महागडी भेट दिली. मी त्यांचा जन्मभर ऋणी राहीन. या घोडीचे पालनपोषण माझ्या मुलीसारखं करेन,असे वचन देतो."
सासरा-जावयाच्या या निरपेक्ष प्रेमाने आणि जिव्हाळ्याने सध्या ईट-पारा परिसरात आनंदाचे वातावरण आहे. पेट्रोलच्या जमान्यात घोडा भेट देणाऱ्या सासऱ्याची आणि 'पार्सल' ऐवजी 'परी' मिळालेल्या जावयाची ही गोष्ट घराघरात पोहोचली असून, या अनोख्या नात्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
