“एसटी संगे तीर्थस्थान” योजनेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; कळंब आगार ठरत आहे श्रद्धेच्या प्रवासाचा विश्वासू साथीदार
कळंब : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कळंब आगाराने अधिक मासानिमित्त सुरू केलेल्या “एसटी संगे तीर्थस्थान” या विशेष उपक्रमाला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. कमी खर्चात, सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत कळंब आगाराने धार्मिक पर्यटनाला नवी दिशा दिली आहे.
कळंब आगारातून राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांसाठी विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून यात श्री पुरुषोत्तम पुरी दर्शन, अष्टविनायक दर्शन, तुळजाभवानी दर्शन, शिर्डी, शेगाव, पंढरपूर, नांदेड, माहूरगड, गाणगापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, शनि शिंगणापूर, रायगड, दीक्षाभूमी नागपूर यांसह अनेक धार्मिक व पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे महिलांसाठी राज्य शासनाच्या धोरणानुसार ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील महिला व पुरुष प्रवाशांना १०० टक्के सवलत दिली जात असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये या योजनेबाबत विशेष आकर्षण निर्माण झाले आहे.
कळंब आगार प्रशासनाने भाविकांच्या मागणीनुसार गट प्रवासासाठीही विशेष बस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे गावोगावी धार्मिक सहलींचे नियोजन अधिक सुलभ झाले आहे.
“प्रवास श्रद्धेचा... सोबत आमची!” या घोषवाक्याला साजेसा उपक्रम राबवत कळंब आगाराने प्रवाशांचा विश्वास संपादन केला आहे. सुरक्षित, आरामदायी आणि परवडणाऱ्या दरात तीर्थयात्रेची संधी उपलब्ध करून देत एसटी महामंडळ सामाजिक बांधिलकी जपत असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
कळंब आगार प्रमुख विजयकुमार धोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, आगामी काळात आणखी नवीन तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्याचा मानस असल्याचे आगार प्रशासनाकडून सांगण्यात आले.या तीर्थ दर्शनाचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी वाहतूक नियंत्रक चेतन गोसावी, वाहतूक अधिकारी आनंत कवडे, निलेश जाधव यांनी आव्हान केले आहे