धाराशिवमध्ये कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी विषयावर सीएमई व कार्यशाळा संपन्न

धाराशिव : धाराशिव स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ संघटनेतर्फे “कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी व लैंगिक आरोग्य” या विषयावर सीएमई व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाभरातील स्त्रीरोगतज्ज्ञ व डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. संजय देशपांडे, डॉ. मदन कांबळे, डॉ. रेश्मा मिर्गे, डॉ. राहुल यंदे, डॉ. पौर्णिमा यंदे, संघटनेचे अध्यक्ष डॉ. आदिनाथ राजगुरू, सचिव डॉ. इस्माईल मुल्ला, उपाध्यक्ष डॉ. वर्षा कस्तुरकर, खजिनदार डॉ. बलवंडे, डॉ. नवल शहा आदींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
प्रास्ताविकात डॉ. आदिनाथ राजगुरू यांनी कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी ही स्त्रीरोगशास्त्रातील आधुनिक शाखा असून महिलांच्या आरोग्य, सौंदर्य, कार्यक्षमता व आत्मविश्वास वाढविण्यासाठी लेझर, पीआरपी तसेच विविध शस्त्रक्रियात्मक व बिनशस्त्रक्रियात्मक उपचारांचा वापर केला जातो, असे सांगितले.
डॉ. संजय देशपांडे यांनी पुरुषांतील लैंगिक समस्या, डॉ. मदन कांबळे यांनी स्त्रियांच्या लैंगिक समस्या व उपचार, डॉ. रेश्मा मिर्गे यांनी कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजीतील लेझर तंत्रज्ञान, तर डॉ. राहुल यंदे व डॉ. पौर्णिमा यंदे यांनी पीआरपी उपचारपद्धती व विविध शस्त्रक्रियांविषयी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत लॅबियाप्लास्टी, व्हजायनल टायटनिंग, हायमेनोप्लास्टी, वारंवार होणाऱ्या संसर्गावरील लेझर उपचार, स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टीनन्स (SUI) व जेनिटोयुरीनरी सिंड्रोम ऑफ मेनोपॉज (GSM) यांसारख्या समस्यांवरील आधुनिक उपचारपद्धतींची माहिती देण्यात आली.
ग्रामीण भागात कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी सेवा उभारणी या विषयावरील चर्चासत्रात डॉ. नवल शहा, डॉ. राहुल यंदे, डॉ. पौर्णिमा यंदे, डॉ. मदन कांबळे, डॉ. स्मिता गवळी व डॉ. रेश्मा मिर्गे यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रिया बाराते व डॉ. शैलजा मिटकरी यांनी केले. आभार प्रदर्शन सचिव डॉ. इस्माईल मुल्ला यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव डॉ इस्माईल मुल्ला व संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
 
Top