विधान परिषद निवडणुकीत नऊ उमेदवाराचे सर्व अर्ज वैध
धाराशिव, दि. 2 -उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नऊ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले होते. मंगळवारी छाननीत नऊ उमेदवारांचे सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.
राज्यातील १७ विधानपरिषद मतदार संघांची निवडणूक सध्या सुरू आहे. उस्मानाबाद (धाराशिव) लातूर आणि बीड जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या विधानपरिषद मतदार संघासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस निर्माण झाली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीकडून भाजपचे बसवराज पाटील तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे युवा नेते महेश देशमुख यांनी आपली उमेदवारी दाखल केली. दिवसभरात एकूण नऊ उमेदवारांनी एकूण १४ अर्ज दाखल केले आहेत. यात बसवराज पाटील यांनी चार अर्ज, काँग्रेसचे महेश देशमुख यांनी दोन, तुळजापूरच्या माजी नगराध्यक्ष अर्चना विनोद गंगणे यांनी दोन अर्ज व उर्वरित प्रत्येकांनी एक अर्ज दाखल केला होता. मंगळवारी उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत नऊ उमेदवारांचे सर्व नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून माघार घेण्यासाठी ४ जून ही अखेरची तारीख असून निवडणूक रिंगणात नेमके किती उमेदवार राहतात, हे ४ जून रोजी समजणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी मतदान प्रक्रिया तर मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे.
वैध ठरलेले उमेदवार
नऊ उमेदवारांनी एकूण १४ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी मंगळवारी छाननी प्रक्रियेत सर्व अर्ज वैध ठरले आहेत. यात प्रमुख उमेदवारांपैकी महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा समावेश आहे. उर्वरित सात उमेदवार हे अपक्ष असून यात तुळजापूरच्या माजी नगराध्यक्ष अर्चना विनोद गंगणे, माजलगावचे अहमद राजसय्यद नूर राज सय्यद, चाकूरचे महालिंगे मिलींद गणपती, माजलगावचे शरद रामभाऊ यादव, धाराशिवचे सचिन भारतराव पवार, माजलगावचे सहाल बिन आमेर चाऊस व कळंबचे संजय मुंदडा यांचा समावेश आहे.