धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने ‘वैशिष्ट्यपूर्ण योजने'अंतर्गत धाराशिव नगरपरिषदेला 18 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. नगराध्यक्षा नेहताई काकडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून या निधीतून आठवडी बाजारासह शहरातील तीन प्रमुख उद्यानांचे सुशोभीकरण व विकासकामे करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा प्रवक्ते नितीन भोसले यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी जारी केला आहे. या निधीमुळे शहरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून, शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.मंजूर निधीतून धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील आठवडी बाजार विकसित करण्यासाठी 8 कोटी रुपये, राजमाता जिजाऊ उद्यानासाठी 5 कोटी रुपये, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासाठी 3 कोटी रुपये आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठी 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण 18 कोटी रुपयांच्या विकासकामांना नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली असल्याचे नितीन भोसले यांनी सांगितले आहे.
या सर्व कामांचा खर्च राज्य शासनाकडून 100 टक्के अनुदानाच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे. या निधीमुळे शहरातील सार्वजनिक सुविधा अधिक सक्षम होणार असून, नागरिकांना आधुनिक बाजारपेठ व आकर्षक उद्यानांचा लाभ मिळेल. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपले महायुती सरकार कटिबद्ध आहे. जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हाती घेतलेल्या विविध प्रकल्प आणि उपक्रमांना मोठ्या प्रमाणात महायुती सरकारकडून बळ मिळत आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शहरवासीयांच्या वतीने आभार मानले असल्याचे नितीन भोसले यांनी म्हटलं आहे.