तुळजापूर (प्रतिनिधी)- मूळचे तुळजापूर येथील आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या उद्योजक कुटुंबातील 25 वर्षीय तरुण केतन विशाल अग्रवाल यांची तरुण-तरुणाने किल्ल्यात उंच भागावरून ढकलल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 

पोलिसांनी केलेल्या तपासात केतन अग्रवाल यांची नियोजित वधू सीना गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी संगनमताने हा कट रचल्याचे समोर आले. 18 जून 2026 रोजी लोणावळा परिसरातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे मानून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र मृत्यूच्या परिस्थितीबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर तपासाची दिशा बदलली. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यातून हा अपघात नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल आणि सीना गोयल यांचे लग्न ठरले होते. मात्र लग्न निश्चित झाल्यानंतर दोघांमधील संबंध बिघडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

याच काळात सीना गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावर ढकलून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मूळचे तुळजापूरचे असलेले केतन अग्रवाल यांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. व्यावसायिक कुटुंबातील तरुणाचा नियोजित कटातून बळी गेल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि न्यायालयीन प्रक्रियेत वेगाने सुनावणी व्हावी, अशी मागणी नागरिक आणि नातेवाईकांकडून केली जात आहे.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top