तुळजापूर (प्रतिनिधी)- माझ्या मुलाला फोन करून बोलावण्यात आले आणि विश्वासघाताने त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील दुसरा आरोपी गेल्या आठ दिवसांपासून फरार आहे. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन कठोर कारवाई करावी,” अशी आर्त मागणी खून झालेल्या कृष्णा रसाळ यांचे वडील अनंत रसाळ यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
घटनेबाबत माहिती देताना अनंत रसाळ म्हणाले की, “प्रसाद रोचकरी यांनी माझ्या मुलाच्या मित्राला फोन करून क्रांती चौकात बोलावले होते. त्यानंतर तेथे माझा मुलगा कृष्णा रसाळ आणि प्रथमेश कांबळे यांच्यात शाब्दिक वाद झाला. काही वेळातच हे प्रकरण हातघाईवर आले.” ते पुढे म्हणाले, “यावेळी कृष्णाचा मित्र मध्ये पडला असता प्रसाद रोचकरी यांनी त्याला अडवले. त्यानंतर प्रथमेश कांबळे याने माझ्या मुलाच्या गळ्यावर आणि छातीवर वार केले. त्यामुळे माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. माझ्या मुलाला संपवण्याच्या उद्देशानेच त्याला बोलावून घेण्यात आले होते असा आरोपी यावेळी केला. या प्रकरणात प्रथमेश कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र दुसरा आरोपी प्रसाद रोचकरी हा गेल्या आठ दिवसांपासून फरार असल्याने कुटुंबीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. “पोलिसांनी आरोपीचे कॉल डिटेल्स तपासावेत. त्याला लवकरात लवकर पकडून सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी,” अशी मागणी अनंत रसाळ यांनी केली.
