धाराशिव (प्रतिनिधी)-  खेळाडूंनी केवळ मैदानावरील सरावावर भर न देता आपल्या दैनंदिन आहाराकडेही तितकेच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य आणि संतुलित आहारामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते, सहनशक्ती वाढते आणि खेळातील कामगिरी अधिक प्रभावी होते. असे प्रतिपादन डॉ. प्रियंका चौरे यांनी केले.

धाराशिव जिल्हा धनुर्विध्या संघटनेच्या वतीने धाराशिव येथील डायट कॉलेज मधील आर्चरी प्रशिक्षण केंद्रामध्ये आयोजित “खेळाडूंसाठी योग्य आहार आणि आरोग्य” या विषयावरील डॉ. प्रियंका चौरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी धाराशिव जिल्हा धनुर्विध्या संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, एनआयएस कोच कैलास लांडगे, क्रिकेट कोच वाले आदीसह विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडू, प्रशिक्षक, पालक तसेच क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. चौरे यांनी खेळाडूंच्या शरीराला आवश्यक असलेल्या पोषकतत्त्वांची सविस्तर माहिती दिली. खेळाडूंनी आपल्या आहारात प्रथिनेयुक्त पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध, अंडी, कडधान्ये, सुकामेवा आणि भरपूर पाण्याचा समावेश करणे आवश्यक आहे. प्रथिनांमुळे स्नायू मजबूत होतात, तर जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. तसेच, अनेक खेळाडू फास्ट फूड, थंड पेये आणि तेलकट पदार्थांचे सेवन करतात. अशा पदार्थांमुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि दीर्घकाळात आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 
Top