धाराशिव (प्रतिनिधी)- बाळासाहेबांच्या विचारांशी निष्ठा हाच आमचा श्वास; जनतेच्या प्रश्नांवरच राजकारणाची दिशा असल्याचे स्पष्ट मत शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक तथा शिवसेनेते माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे यांनी व्यक्त केले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिव जिल्हा सचिव प्रवीण कोकाटे यांनी जिल्ह्यातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर नितांत श्रद्धा असलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधत वैचारिक निष्ठेचा निर्धार अधिक दृढ केला. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला स्वाभिमान, हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी संघर्षाचा वारसा हाच शिवसेनेचा आत्मा असून, त्याच विचारांच्या बळावर धाराशिव जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वाटचाल अधिक सक्षम केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जनतेच्या सुख-दुःखाशी एकरूप होत त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणे आणि लोकहितासाठी सातत्याने संघर्ष करणे, हीच खरी शिवसैनिकाची ओळख असल्याचे प्रवीण कोकाटे यांनी अधोरेखित केले. शेतकरी, युवक, महिला, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर प्रभावी पाठपुरावा करण्यालाच प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

बाळासाहेब ठाकरे यांनी रुजविलेल्या विचारांशी कोणतीही तडजोड न करता, निष्ठा आणि जनविश्वास या भक्कम आधारावर शिवसेनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने समाजात सक्रिय राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. विचारांवरील अढळ निष्ठा, जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि लोकहितासाठी सातत्याने संघर्ष, हाच पुढील वाटचालीचा मूलमंत्र राहील, असा विश्वास प्रवीण कोकाटे यांनी व्यक्त केला.

 
Top