धाराशिव (ंप्रतिनिधी)- कळंब पवन ऊर्जा प्रकल्प टप्पा-1 हा जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार असून, नवीकरणीय ऊर्जेच्या माध्यमातून जिल्ह्यात शाश्वत विकासाला चालना मिळेल.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात सेरेंटिका कंपनीच्या 30 मेगावॅट क्षमतेच्या कळंब पवन ऊर्जा प्रकल्प टप्पा-1 चे उद्घाटन उत्साहात पार पडले. उद्घाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक रितू खोखर, सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव के.पी.बक्षी,सेरेंटिका रिन्यूएबल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय हिराचंदानी,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,कळंब उपविभागीय अधिकारी श्री.शिंदे,धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,सेरेंटिकाचे निनाद पितळे तसेच श्रीमती अन्नपूर्णा जे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्याच्या औद्योगिक व पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार असे सांगून पुजार म्हणाले की,जिल्ह्यात विविध कंपन्यांचे नवीकरणीय ऊर्जेचे प्रकल्प सुरू असून,कळंब प्रकल्पासाठी शेतकरी व कंपनी यांच्यात सातत्याने संवाद साधण्यात आला.सेरेंटिका कंपनीला राज्यात 1200 मेगावॅट क्षमतेची मंजुरी मिळाली असून,धाराशिव जिल्ह्यात सुमारे 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.नवीकरणीय ऊर्जेच्या प्रकल्पांबाबत शेतकऱ्यांकडून यापूर्वी मोर्चे,निवेदने व उपोषणे होत होती. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी स्तरावर नियमित बैठका घेऊन बाधित शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे पुजार यांनी सांगितले.
सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव के. पी.बक्षी यांनी सांगितले की, देशात 2023 पर्यंत 400 गिगावॅट पवन ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यापैकी सुमारे 200 गिगावॅट निर्मिती पूर्ण झाली असून उर्वरित काम वेगाने सुरू आहे. पोलीस अधीक्षक रितू खोखर म्हणाल्या की,कळंब पवन ऊर्जा प्रकल्प टप्पा-1 पूर्ण होणे ही आनंदाची बाब आहे. सेरेंटिका रिन्यूएबल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय हिराचंदानी यांचेही भाषण झाले. आभार प्रदर्शन सुरजीत नारायण यांनी केले.
