धाराशिव (प्रतिनिधी)- विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर नमुना मतपत्रिकांच्या छपाईवर प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत.निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी,यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत आदेश जारी केले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने 18 मे 2026 रोजी उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.  या निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार,त्यांचे प्रतिनिधी,हितचिंतक तसेच मुद्रणालय चालक आणि अन्य माध्यमांद्वारे छपाई करणारे मालक व प्रकाशक यांनी नमुना मतपत्रिका छापताना काही नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार,इतर उमेदवाराचे नाव अथवा त्यांना नेमून दिलेले निवडणूक चिन्ह वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच नमुना मतपत्रिका छापताना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या प्रकारचाच कागद वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.आयोगाने निश्चित केलेल्या आकारामध्येच नमुना मतपत्रिका छापाव्यात,असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित सर्वांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यानंतर हे आदेश जारी करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नमुना मतपत्रिकांच्या छपाईवर वरीलप्रमाणे निर्बंध लागू राहणार असून,निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व शिस्त राखण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 
Top