धाराशिव (प्रतिनिधी)-  विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर लावण्यात येणाऱ्या निवडणूक साहित्यावर प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत.वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये तसेच अपघाताची शक्यता टाळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी,या उद्देशाने राजकीय पक्ष,निवडणूक लढविणारे उमेदवार,त्यांचे प्रतिनिधी आणि हितचिंतक यांच्यावर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. आदेशानुसार,सार्वजनिक इमारती, सार्वजनिक रस्ते तसेच अन्य ठिकाणी निवडणुकीसंदर्भातील पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्डिंग्ज, कमानी आदी साहित्य अशा पद्धतीने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होईल किंवा अपघात होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 (1) (डीबी) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश लागू केले आहेत. 

 
Top