धाराशिव (प्रतिनिधी)-  विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.निवडणूक कालावधीत जात, धर्म किंवा भाषावार शिबिरे तसेच मेळावे आयोजित करण्यावर निर्बंध घालण्यात आले असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पाडण्यासाठी नगरपरिषद हद्दीत कोणत्याही प्रकारचे जातीय,धार्मिक अथवा भाषावार शिबिरांचे व मेळाव्यांचे आयोजन होऊ नये, यासाठी निर्बंध लावण्याची आवश्यकता असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश लागू केले आहेत. संबंधित सर्वांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश जारी करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

यानुसार,धाराशिव जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कुठेही जात,भाषा किंवा धर्म यांच्या आधारावर शिबिरे अथवा मेळावे आयोजित करता येणार नाहीत.हे आदेश 18 मे ते 25 जून 2026 या कालावधीत धाराशिव,लातूर आणि बीड जिल्ह्यांत लागू राहणार आहेत. निवडणुकीदरम्यान सामाजिक सलोखा व शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्यात येत आहे.

 
Top