धाराशिव (प्रतिनिधी)-  राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये नियमांचे पालन व्हावे आणि शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कृषी उत्पन्न पणन विभागाने दिला आहे.यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले असून,व्यापारी,संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कायद्यातील तरतुदींचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 व नियम 1967 लागू असून, या कायद्यानुसार राज्यातील शेतमाल खरेदी-विक्रीचे विनियमन करण्यात येते.मात्र,सध्या राज्यातील विविध भागांमध्ये अनेक व्यापारी,काही संस्था तसेच शेतकरी संस्था मोठ्या प्रमाणात कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी-विक्री करत असल्याच्या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत.

या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधितांना वेळोवेळी अशा प्रकारचे व्यवहार करणे अनुचित असल्याचे कळविण्यात आले होते.तरीही अनेक व्यापारी व संस्था विनापरवानगी शेतमाल खरेदी-विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासनाने 5 जुलै 2016 रोजी अध्यादेश क्रमांक 15 राजपत्रात प्रसिद्ध केला होता.या अध्यादेशाच्या अंमलबजावणीबाबतच्या सूचना 8 जुलै 2016 रोजी निर्गमित करण्यात आल्या होत्या.त्यानंतर दि. 31 डिसेंबर 2018 रोजीच्या शासन राजपत्रान्वये मुख्य अधिनियमाच्या कलम 6 मधील पोटकलम 2 मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे.

 
Top