धाराशिव (प्रतिनिधी)-  चालू वर्षात ‌‘एल-निनो' प्रभावामुळे महाराष्ट्रातील शेतीसमोर गंभीर आव्हाने उभी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाचे उशिरा आगमन,पावसातील प्रदीर्घ खंड तसेच एकूण पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. या संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि पिकांना पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता मिळावी यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ‌‘मूलस्थानी जलसंधारण' तंत्राचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

शेतात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून ओलावा टिकवून ठेवणे,ही काळाची गरज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.त्यासाठी मशागत आणि पेरणीच्या पद्धतीत बदल करण्यावर भर देण्यात आला आहे.शेताची नांगरणी व मशागत उताराला आडवी करावी,जेणेकरून पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरेल.तसेच पेरणी समपातळीवर केल्यास जमिनीची धूप थांबून पाण्याचा प्रत्येक थेंब पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.

रुंद सरी-वरंबा पद्धतीचा वापर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.या तंत्रामुळे पावसाच्या खंडात जमिनीत ओलावा टिकून राहतो,तर अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाण्याचा सुरक्षित निचरा होतो.यासोबतच जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी धूप प्रतिबंधक पिके घेणे आणि खोल नांगरट करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. उभ्या पिकांमध्ये आंतरमशागत,सरी काढणे आणि ‌‘मृत सरी' तयार करणे या उपाययोजना पिकांना जीवदान देणाऱ्या ठरू शकतात.पावसाचा मोठा खंड पडल्यास या सऱ्यांमुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.तसेच जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी सेंद्रिय अवशेषांचे आच्छादन करण्याचा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे.

 
Top