धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून रोटरी क्लब धाराशिव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत रक्त तपासणी शिबिरास रोटरियन,  व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रामनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, न. प. शाळा क्रमांक 24 येथे पार पडलेल्या या शिबिरामध्ये तब्बल 125 जणांनी सहभाग नोंदवून विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. विशेष बाब प्राथमिक आरोग्य केंद्राकडे तपासणीसाठी व टेस्टसाठी लोकांचा वाढता कल आहे.

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व लक्षात घेऊन रोटरी क्लब धाराशिवतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरामध्ये CBC Count, LFT (Liver Function Test), KFT (Kidney Function Test), Lipid Profile, Thyroid Test, Electrolyte Test, HbA1c तसेच Sugar Fasting / PP अशा विविध रक्त तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. सकाळपासूनच सहभागींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली.

या शिबिरास रोटरी क्लब धाराशिवचे अध्यक्ष रंजीत रनदीवे, सचिव प्रदीप खामकर तसेच रोटरी सेवा ट्रस्टचे सचिव प्रवीण काळे, सदस्य सुनील गर्जे, चित्रसेन राजेनिंबाळकर, पी. के. मुंडे यांनी उपस्थित राहून शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच रोटरी सदस्य संजय चव्हाण, चंदन भडंगे, अमोल माने, गिरीश आस्टगी, अभिजित पवार, अभिजित पाटील, सूरज कदम  तसेच शासकीय अधिकारी डॉ. स्वप्नील आकोसकर वैद्यकीय अधिकारी, डॉ.अनुराधा लोखंडे वैद्यकीय अधिकारी, चेतन दुबे औषध निर्माता, माया राठोड स्टाफ नर्स, तहसीन शेख स्टाफ नर्स, अर्चना शिंदे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्वराज सूर्यवंशी प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी देखील शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

शिबिरामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी रोटरी क्लब धाराशिवच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी व समाजामध्ये नियमित आरोग्य तपासणीची सवय वाढीस लागावी, या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. रोटरी क्लब धाराशिवच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला असून, नागरिकांनी  प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वाढता कल दिसत आहे अशा उपक्रमांमध्ये पुढील काळातही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.


 
Top