धाराशिव (प्रतिनिधी)- मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्नरीक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यासह धाराशिव जिल्ह्यात कामाला वेग आला असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून मतदारांचे मॅपिंग सुरू आहे.मात्र, 2002 मधील मतदार यादी आणि सध्याच्या यादीतील नावे जुळविताना विविध अडचणी निर्माण होत असल्याने कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाऊ नये, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय एजंटांची (बीएलए) नियुक्ती करून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्नरीक्षण आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,पोलीस अधीक्षक रितू खोखर,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष यादव,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, तुळजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चोक्कलिंगम म्हणाले की,शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या जिल्हाध्यक्षांमार्फत अधिकृत बीएलए यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर करणे अपेक्षित आहे. धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने 1523 बीएलए नियुक्त केले आहेत.मात्र,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,शिवसेना, शिवसेना (उबाठा),वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी आणि इतर पक्षांकडून अद्याप बीएलएची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर मतदार मॅपिंग प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या बीएलओंवर कारवाई करणार- पुजार
उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुक संदर्भातील मतदार संख्या, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी,निवडणूक समित्या आदींची माहिती बैठकीत जिल्हाधिकारी पुजार यांनी सादर केली. तसेच एसआयआर मॅपिंगसाठी बीएलओंच्या नियुक्त्या,त्यांचे प्रशिक्षण,राजकीय पक्षांसोबत झालेल्या बैठका,बीएलए नियुक्ती, झालेले मॅपिंग आणि आतापर्यंतची कार्यवाही याचा तपशील त्यांनी मांडला. दरम्यान,मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्नरीक्षणाच्या कामात कसूर करणाऱ्या किंवा दुर्लक्ष करणाऱ्या बीएलओंवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यावेळी दिला.
