धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील बेंबळी येथील शेतकरी महेश्वर चंद्रकांत माळी यांनी आपल्या शेत रस्त्याच्या मागणीसाठी अखेर सहकुटुंब बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे, पत्नी, दोन मुलं आणि अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीसह त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याने या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
महेश्वर माळी यांची विठ्ठलवाडी शिवारातील गट क्रमांक 18, 19 आणि 20 मध्ये शेती असून, गेल्या सहा वर्षांपासून शेताला जाण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तहसील कार्यालयाने रस्ता मंजूर केल्याचा दावा माळी यांनी केला असला तरी प्रत्यक्षात रस्ता खुला करण्यात आलेला नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
माळी यांनी लाखो रुपये खर्च करून पपई पिकाची लागवड केली असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ता उपलब्ध झाला नाही तर पिकाचे मोठे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षीही रस्ता नसल्याने पिक काढणी करताना नुकसान सहन करावे लागल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सुनावणीनंतर विरोधकांकडून धमक्या आणि शिवीगाळ झाल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने अखेर संपूर्ण कुटुंबासह उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “शेत रस्त्याबाबत अंतिम निर्णय होऊन रस्ता प्रत्यक्ष खुला होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा महेश्वर माळी यांनी दिला आहे.
